
TIN24 EDITOR : अमित अल्हाट
मुंबई | दि. ३० जुलै : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाची अधिकृत सुरुवात केली आहे. वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी उपस्थितांनी अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याची सामूहिक शपथ घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा आहे. भारताची युवा शक्ती व्यसनांच्या विळख्यात अडकवून देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असून, त्याविरोधात प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ड्रग्सची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी त्यांनी ‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची घोषणा केली. राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हटले की, “विद्यार्थ्यांनी ‘ड्रग्सला नाही’ असा ठाम निर्धार केल्यास कोणतीही शक्ती त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊ शकत नाही.” पुढील दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे अभियान केवळ सरकारी उपक्रम नसून लोकचळवळ बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाने युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.
लोढा यांनी १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजना सुरू होणार असल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे.
अभियानांतर्गत मुंबईतील ४,००० हून अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन समित्या, तसेच १,००० हून अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले आहे. शुभारंभ सोहळ्यात ५ लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि नागरिक ऑनलाइन सहभागी झाले.
कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘Training Manual for Counsellors’ या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
