एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी पद्धतीने; 21 दिवसांत निकाल, वर्षाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय; परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती वाढणार

मुंबई | प्रतिनिधी | TIN24 Mrs Sunita

“एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी पद्धतीने; 21 दिवसांत निकाल आणि वर्षाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य.”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व आगामी पूर्व परीक्षा आता संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत परीक्षा प्रक्रियेतील विलंब कमी करणे आणि भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.

मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष विवेक भीमनवार बोलत होते. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख उपस्थित होते.

अध्यक्ष भीमनवार यांनी सांगितले की, यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील निवड प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने आता पूर्व परीक्षांचे निकाल अवघ्या 21 दिवसांत जाहीर करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल केवळ 22 दिवसांत जाहीर करण्यात आला असून, भविष्यात हा कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

तसेच, ज्या वर्षी परीक्षा होईल त्याच वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे ध्येय आयोगाने निश्चित केले आहे. मुलाखतींचा समावेश असलेल्या पदांची भरती प्रक्रिया 9 ते 11 महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षांवर आधारित पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांच्या करिअरमधील अनिश्चितता कमी होऊन त्यांना वेळेवर संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले की, सीबीटी पद्धतीचा अवलंब फक्त पूर्व परीक्षांसाठीच केला जाणार असून, राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीनेच घेतल्या जातील.

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन ही प्रणाली नवीन नसून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी सुमारे 140 परीक्षा यशस्वीरित्या सीबीटी पद्धतीने आयोजित केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ही पद्धत वैज्ञानिक, न्यायालयमान्य आणि देशभरात स्वीकारली गेलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशातील विविध भरती संस्थांचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते. तसेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) सुमारे एक कोटी उमेदवारांच्या परीक्षा याच पद्धतीने यशस्वीरित्या घेतल्या आहेत. महाराष्ट्रातील सीईटी सेलनेही अलीकडे 16.30 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतल्या असून, राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) देखील याच प्रणालीचा अवलंब करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद, कार्यक्षम आणि कालबद्ध होणार असून, भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणावर कमी होऊन लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

— TIN24

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24