राज्य आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश
मुंबई, दि. 23 (TIN24): भूस्खलन व इतर नैसर्गिक आपत्तींनंतर प्रभावित क्षेत्रांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करून पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी शाश्वत व समन्वित उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे, रायगड, कोल्हापूर, पुणे, नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्हे पूर आणि भूस्खलनाच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याचे सांगत पूरनियंत्रणासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश दिले. पाणी निचरा यंत्रणेत सुधारणा, पूर्वसूचना प्रणाली बळकट करणे आणि प्रभावी स्थलांतर योजना राबविण्यावर भर देण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर व्यापक सर्वेक्षण करून संवेदनशील गावे व ठिकाणांची अद्ययावत माहिती तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. संभाव्य धोक्यांच्या आधारे जिल्हास्तरीय यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आपत्तीपश्चात पुनर्बांधणी आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून कार्यवाही सुरू असून, नैसर्गिक आपत्तीमुळे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सुमारे ₹9,678 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
भूस्खलन जोखीम व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ₹100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील आठ संवेदनशील ठिकाणी उतार स्थिरीकरण, धूप नियंत्रण, संरक्षक जाळ्या, पूर्वसूचना प्रणाली आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यानुसार विविध प्रकल्पांसाठी एकूण ₹29,707.42 कोटींच्या नियोजनाची आवश्यकता असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या तयारीचा, जोखीम व्यवस्थापनाचा आणि आपत्ती प्रतिसाद यंत्रणेचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
