प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून एकत्रित कार्यपद्धती कार्यरत

“अमली पदार्थमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल; प्रत्येक पोलीस ठाण्यात उभारले जाणार स्वतंत्र अमली पदार्थविरोधी युनिट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.”

मुंबई, दि. २३ (TIN24): राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे देशासमोरील गंभीर आव्हान असून त्याच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून ‘Whole of Government Approach’ अंतर्गत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

राज्यात अवैध अमली पदार्थांची शेती, उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात आहे. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानासह राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, NDPS कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाला सूचना पाठविण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार NDPS कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर अमली पदार्थविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती, विशेष नियुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०२५ मध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स व पोलीस यंत्रणेमार्फत ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत १,१४२ गुन्हे दाखल करून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली असून २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मे २०२६ अखेर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ५२८ गुन्हे दाखल करून ६५५ आरोपींना अटक करण्यात आली असून, सेवन करणाऱ्या २,८५५ जणांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

सलीम डोला या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपीला परदेशातून अटक करून भारतात आणण्यात आले असून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ पूर्णपणे जाळून नष्ट करण्यात येत असल्यामुळे ते पुन्हा बाजारात येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या सात युनिट्स कार्यरत असून नव्याने पदनिर्मिती करून त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना बक्षीस देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे.

व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी मुंबई व परिसरात विशेष केंद्रे उभारण्याबरोबरच आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चित्रपट व इतर माध्यमांमधून अमली पदार्थांचे होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

– अमित अल्हाट
संपादक, THE INDIA NEWS 24 (TIN24)

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें