आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती एसएचआरसी मूल्यांकनानुसार पारदर्शकपणे करा :- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 |EDITOR Amit Alhat

मुंबई, दि. ११ : सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.

या निर्णयामुळे आरोग्य सेवांचे कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागाला तांत्रिक सहकार्य पुरवते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे’ ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढवणे, आरोग्यविषयक संशोधन आणि तांत्रिक सहकार्य प्रदान करते. एसएचआरसी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आणि महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते.

यात प्रशासकीय, तांत्रिक आणि वित्तीय बाबींचा समावेश असतो. दरमहा कामगिरीवर आधारित गुणवत्ता रँकिंग दिली जाते. यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती या रँकिंग प्रणालीच्या अहवालानुसार करण्यात येतील, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत असतो. याशिवाय नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)’ माध्यमातून निधी मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएम), जिल्हा लेखा व्यवस्थापक (डीएएम), एनएचएम सल्लागार आणि एनएचएम कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावेत, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण आणि अधिकाऱ्यांच्या भेटींशी संबंधित सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सह संचालिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें