चैत्यभूमीवर 69व्या महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई, दि. 6 – TIN24 | संपादक : अमित अल्हाट

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अशा विशाल राष्ट्ररचनेत एकता, न्याय, समता आणि बंधुता टिकवून ठेवण्यासाठी संविधान निर्मिती हे अत्यंत महान व ऐतिहासिक कार्य होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या सामाजिक विविधतेला एकसूत्रात बांधून सर्व नागरिकांना समान हक्क देणारे संविधान देशाला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
दादर येथील चैत्यभूमी येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, जेव्हा एखाद्या राष्ट्रात युगपुरुष जन्म घेतो, तेव्हाच सामाजिक न्यायाचे आंदोलन अधिक बळकट होते. अशा युगपुरुषांचे विचार आणि कार्य शाश्वत असते, म्हणूनच बाबासाहेब आजही आपल्या विचारांतून जिवंत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी शिक्षणालाच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. एक शिक्षित व्यक्ती संपूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे भविष्य घडवू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
भारत आज चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रातही बाबासाहेबांचे योगदान मोलाचे असून राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना त्यांच्या विचारांतूनच स्वीकारण्यात आली. त्यामुळे आज देश ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण संविधानामुळेच शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
चैत्यभूमी परिसरात प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेबांचे विचार राष्ट्राला दिशा देत राहतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे भारतीय लोकशाहीला बळकट आधार मिळाला. त्यांचा संघर्ष हा केवळ एक समाजाचा नव्हता, तर संपूर्ण मानवमुक्तीचा संघर्ष होता.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनाचा दीपस्तंभ आहे. संविधानाच्या माध्यमातून वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. राज्यपालांनी भिक्षूंना चिवरदान केले. बीएमसीतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनालाही मान्यवरांनी भेट दिली. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून दिली.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
