वृत्त क्र. 4368 | TIN24 विशेष प्रतिनिधी सौ सुनिता अल्हाट
मुंबई, दि. 12 : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त अमरावती येथे झालेल्या भारतीय अभिजात भाषा परिषदेत तंत्रज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 6 ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित या परिषदेत देशातील अकरा अभिजात भाषांचे तज्ञ, संशोधक आणि विद्वान सहभागी झाले.
या परिषदेत डिजिटल इंडिया भाषिनी विभागाने विकसित केलेल्या ‘श्रुतलेख’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्पीच-टू-टेक्स्ट प्रणालीद्वारे प्रथमच थेट बहुभाषिक भाषांतराची सुविधा उपलब्ध झाली. या प्रयोगामुळे भाषण आणि विचार विविध भाषांतील प्रेक्षकांना त्यांच्या भाषेत एकाच वेळी पाहता आले. देशात प्रथमच अशा प्रकारे थेट बहुभाषिक भाषांतराचा प्रयोग झाल्याने भाषा क्षेत्रातील डिजिटल नवकल्पनेचे हे पाऊल ऐतिहासिक ठरले आहे.
परिषद मराठी भाषा विभाग आणि रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. यावेळी केंद्र आणि राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक तज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “पहिल्यांदाच देशातील सर्व अभिजात भाषांचे स्वर एकाच मंचावर एकवटले आहेत. ‘श्रुतलेख’ अॅपमुळे भाषेतील अडथळे दूर होत असून ही तांत्रिक नव्हे, तर सांस्कृतिक एकतेची दिशा आहे.”
कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, कुलगुरू डॉ. अविनाश आवलगांवकर, डॉ. मिलिंद बारहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. परिषद पारंपरिक दिंडी मिरवणुकीने सुरू झाली आणि मेळघाट आदिवासी कलावंतांच्या सादरीकरणाने रंगतदार झाली.
तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, मराठी, प्राकृत, पाली आणि आसामी भाषांचे तज्ञ अभिजात भाषांच्या जतन व संवर्धनावर विचारमंथनासाठी एकत्र आले. मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, अभिजात भाषांचे भविष्य परस्पर संवाद आणि सहकार्यावर अवलंबून आहे. मराठी भाषेचा विकास साहित्यापुरताच मर्यादित न राहता रोजगार आणि उद्योगव्यवस्थेतही वाढला पाहिजे.
भाषिनी विभागाचे व्यवस्थापक समीर पाटील यांनी सांगितले की, या परिषदेत ११ स्वतंत्र स्क्रीनवर थेट बहुभाषिक भाषांतर दाखविण्यात आले. हा देशातील पहिला प्रयोग असून भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा तो उत्कृष्ट दाखला आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
