मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
TIN24 EDITOR – अमित अल्हाट
ठाणे, दि. 28 (जिमाका) – कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि “मनुष्य व पशुहानी टाळणे हेच सर्वोच्च प्राधान्य असावे” असे स्पष्ट निर्देश दिले.
कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड तसेच महानगरपालिकांचे आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत प्रशासनाने माहिती दिली की गेल्या २४ तासांत सरासरी ८० ते १०० मिमी पाऊस पडला असून, ठाणे–पालघर–रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी ती अद्याप धोक्याच्या पातळीपेक्षा खाली आहे. बदलापूरमध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता अन्यत्र जीवित किंवा पशुधन हानी झालेली नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले –
पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तातडीची तयारी करावी.
आपत्कालीन यंत्रणांचे फोन २४x७ कार्यरत ठेवावेत.
वीज महामंडळाने नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा.
धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या कराव्यात.
धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मनुष्यबळ तैनात करावे.
महामार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर द्यावा.
दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावे आधीच रिकामी करून सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावीत.
🌧️ मराठवाड्यातील परिस्थितीवरही लक्ष
शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अहिल्यानगर जिल्ह्यांतील पूरस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी व आमदारांशी संवाद साधून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, निवास, जेवण व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने “अटी-शर्ती बाजूला ठेवूनही तातडीची मदत देण्यास शासन कटिबद्ध आहे” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
