नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा व शाळांच्या कामांना तातडीने प्राधान्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना स्पष्ट निर्देश; दप्तर हस्तांतरण प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश
द इंडिया न्यूज २४ संपादक: अमित अल्हाट
मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२५: नवी मुंबई महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि शाळांच्या विकासकामांना तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या गावांमधील दप्तर हस्तांतरण प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचेही त्यांनी आदेश दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ही सूचना देण्यात आली.
या बैठकीत नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना सांगितले की, या गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कार्यवाहीला वेग द्यावा. तात्पुरत्या आरोग्य सुविधांसाठी पोर्टा केबिनच्या माध्यमातून दवाखाने सुरू करण्यात यावेत. नावळी येथील जुन्या इमारतीत नव्याने रुग्णालय सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत.
बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे सांगितले की, वाकळण येथील तलावाचे सुशोभीकरण करून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत या गावांमध्ये साफसफाईची मोहीम राबवावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि या गावांमधील शासकीय दप्तर नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा.
महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, या गावांचा नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. रस्ते, पायाभूत सुविधा आणि जमिनीच्या उपयोगाचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या १४ गावांसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्राधान्याने शाळा, आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पायवाटा आणि रस्ते या सुविधांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे नवी मुंबईतील नवसमाविष्ट गावांमध्ये विकासाची नवी लाट येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे पाऊल स्थानिक नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
