संपन्न औद्योगिक महाराष्ट्रासाठी ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’
महाराष्ट्राला उद्योगस्नेही बनविण्यासाठी ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’वर भर: परवाने कमी, वेळेची बचत – मुख्यमंत्री फडणवीस
परवाने कमी करून नवीन उद्योगासाठी लागणारा वेळ कमी करावा
मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२५ (TIN24) : महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य आहे. या गुंतवणुकीचे उद्योगात रूपांतर जलदगतीने व्हावे यासाठी शासनाकडून सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारी परवाने कमी करून उद्योजकांचा वेळ वाचवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ वॉर रूम बैठकीत सुधारणांचा आढावा घेताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संपन्न औद्योगिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ धोरण प्रभावीपणे राबवले जात आहे. या धोरणांतर्गत सुधारणांची काटेकोर अंमलबजावणी करून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्राला देशातील ‘बेस्ट मॉडेल’ बनवावे.” यासाठी नगरविकास विभागाने इमारत बांधकाम परवानगीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑनलाइन यंत्रणा विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. या यंत्रणेद्वारे अर्जदाराने नियमानुसार अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम परवाना तात्काळ मिळेल, अशी ‘ऑटो सिस्टीम’ कार्यान्वित करावी, असेही त्यांनी नमूद केले.
उद्योग सुरू करण्यासाठी अनेक परवाने विविध विभागांशी संबंधित असतात. यासाठी एकाच अर्जाद्वारे सर्व परवाने मिळतील, अशी एकखिडकी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून उद्योजकांना वारंवार अर्ज करण्याची गरज पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, प्रदूषणाच्या बाबतीत हिरव्या श्रेणीतील (ग्रीन कॅटेगरी) उद्योगांना ठराविक वर्षांसाठी परवाने घ्यावे लागणार नाहीत, अशी सोय करावी. या कालावधीनंतर नियमानुसार परवाने देऊन नियमन करावे, असेही त्यांनी सुचवले.
जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी जलदगतीने कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांमध्ये राज्यस्तरीय समन्वय वाढवावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. “राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून उद्योगवृद्धीवर भर दिला जात आहे. या सुधारणांमुळे अधिक गुंतवणूक आकर्षित होऊन उद्योगांना चालना मिळेल. यामुळे महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवउद्योजकांना महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी देशात सर्वात कमी वेळ लागतो, असा विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीला उपस्थिती
या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव (उद्योग) पी. अल्बलगन, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी सादरीकरण केले.
संपादक: अमित आल्हाट, TIN24 (THE INDIA NEWS 24)
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
