गोंदिया जिल्ह्यातील जनसुनावणी यशस्वी :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर..
एकूण ५६ तक्रारींवर कार्यवाही
समुपदेशनाने महिलांचे समाधान करण्याचा आयोगाचा प्रयत्न
गोंदिया, दि. १८ (TIN24 प्रतिनिधी) : गोंदिया जिल्ह्यात काल पार पडलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण ५६ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. ८ कौटुंबिक प्रकरणांचा निपटारा करून पुन्हा सलोखा कायम करण्यात आयोगाला यश आले असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जनसुनावणीनंतर सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे, यांच्यासह समुपदेशक, तक्रारदार, पॅनलमध्ये समाविष्ट विधीतज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या जनसुनावणी कार्यक्रमात महिला आयोगाची भूमिका मांडताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, कायदा, सुरक्षा व प्रशासन हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची असून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या तक्रारींना न्याय मिळत आहे. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
काल पार पडलेल्या जनसुनावणीदरम्यान एकूण ५६ तक्रारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदवण्यात आल्या, ज्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक होते. समुपदेशकांच्या मदतीने ८ कौटुंबिक वाद मिटवण्यात यश मिळाले असून, त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये सलोखा राखण्याचा प्रयत्न आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोगाने समुपदेशकांचे यावेळी विशेष आभार मानले.
त्या पुढे म्हणाल्या, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिलांच्या तक्रारी आयोगाला प्राप्त होतात. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी दरवेळी महिलांना मुंबईला जाणे सोईचे नसते. त्यासाठी जिल्हास्तरावर तक्रारींचे निराकरण करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणीमध्ये महिलांचा वेळ व पैसा वाचतो, सोबतच प्रत्यक्ष जागेवरच न्याय मिळत असल्याने महिलांना आश्वासक समाधानही मिळत आहे.
जनसुनावणीमध्ये कौटुंबिक हिंसाचारासोबतच बालविवाह, विधवांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच हुंडाबळी यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, विधी सेवा प्राधिकरण, भरोसा सेल, दामिनी पथक, वन स्टॉप सेंटर हे सक्रिय सहकार्य करीत असतात.
यावेळी आय-सी कमिटी (Internal Complaints Committee) संदर्भात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येक उद्योग, व्यवसाय व आस्थापनांमध्ये महिला कार्यरत आहेत. अशा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कायद्यानुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या जनसुनावणीमुळे अनेक महिलांना न्याय मिळाला आणि कुटुंबांमध्ये संवाद व सलोखा निर्माण झाला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी विभागांचे आणि समुपदेशकांचे कौतुक करत रुपाली चाकणकर यांनी हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले.
गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांची प्रकरणे संवेदनशीलरित्या हाताळली जात असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलामार्फत महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पोलीस प्रशासनामार्फत सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘भरोसा’ सेल पथक व समुपदेशन सेल पथकाद्वारे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक गोरख भामरे म्हणाले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे सांगत, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला म्हणाले, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांद्वारे प्रशासनामार्फत आर्थिक सहयोग केले जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जनसुनावणी मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी रामटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जि.प.चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे, माविमच्या प्रकल्प समन्वयक संगिता भोंगाडे, विधी सल्लागार तिलकसिंह गौतम, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या मनिषा चौधरी, संरक्षण अधिकारी रविंद्र टेंभुर्णे व मुकेश पटले यांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तीन पॅनलद्वारे तक्रारींचे निराकरण
महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता आयोजित जनसुनावणीसाठी तीन पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये विधी तज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती
आयोगाच्या या जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांनी चांगली उपस्थिती दर्शविली. आलेल्या प्रत्येक महिलेस सुरुवातीस कक्षाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून टोकन नंबर देण्यात आले. त्यानंतर देण्यात आलेल्या पॅनलसमोर उपस्थित राहून महिलांनी आपल्या लेखी तक्रारी, समस्या सादर केल्या. प्रत्येक महिलेचे म्हणणे पॅनल सदस्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर कार्यवाही केली.
सलोख्याने समाधान झालेल्या जोडप्यांना गुलाब पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा
ज्या कुटुंबांमध्ये काही कारणास्तव गैरसमज निर्माण झालेले होते. त्यांचे म्हणणे ऐकून कुटुंबात पुन्हा सलोखा निर्माण व्हावा, असे समुपदेशन यावेळी करण्यात आले. सलोखा झालेल्या जोडप्यांना यावेळी गुलाब पुष्प एकमेकांना देऊन नव्याने आनंदाने संसार करण्याच्या शुभेच्छा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिल्या. भावनिक झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर जाताना आनंदाश्रू दिसत होते.
श्री. महावीर मारवाडी शाळेने दामिनी पथकाचे आभार मानले
राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या दामिनी पथकाद्वारे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. श्री. महावीर मारवाडी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना याचा मोठा लाभ होत असल्याचे प्राचार्य अभिषेक अग्रवाल यांनी श्रीमती चाकणकर यांना धन्यवाद देत सांगितले. या शाळेत जवळपास १३०० विद्यार्थिनी आहेत.
द इंडिया न्यूज २४ संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
