टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
नागपूर, दि. १२ सप्टेंबर २०२५ (TIN24) : टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या वतीने रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार असून, दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ होईल.
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार आणि महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. रामटेकजवळील रामगिरी येथे खासगी सहभागातून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार आदी उपस्थित होते.
हे केंद्र ‘सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोवेशन, इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग’ (सीआयआयटी) म्हणून ओळखले जाईल. यात विद्यार्थ्यांसाठी नवउपक्रम, संशोधन आणि अत्याधुनिक प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असतील. औद्योगिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार असून, इनोवेशन, डिझाईन आणि इन्क्युबेशन यासह नऊ प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल. हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती करेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.”
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूरसह कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तरप्रदेश आणि तेलंगणा येथे अशीच केंद्रे उभारली आहेत. हा प्रकल्प ११५ कोटी रुपयांचा असून, त्यातील ९८ कोटी रुपये टाटा टेक्नॉलॉजीकडून उपलब्ध होणार आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीचे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार म्हणाले, “या केंद्रामुळे उत्पादन क्षेत्रातील अभियंते, ऑपरेटर आणि तंत्रज्ञांची निर्मिती होईल. विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकासाद्वारे कुशल संसाधने आणि उद्योजक घडवता येतील.”
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील कौशल्य विकासाला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
टीआयएन२४ संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
