शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

मुंबई, दि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या बैठकीत (माहेड) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे (एनसीपीएस) उद्घाटनही करण्यात आले.

 

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालये सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित करण्याच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्याबाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत इरादा पत्र प्राप्त ७३९ महाविद्यालयांपैकी ५९३ महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला चालना देणारी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली’ (New College Permission System – NCPS) चे उद्घाटन करण्यात आले. या प्रणालीद्वारे इच्छुक संस्थांना

https://htedu.maharashtra.gov.in/NCP

या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. ही डिजिटल प्रणाली महाविद्यालय मान्यता प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि सुलभ बनवेल.

 

बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार सुजय विखे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, रुसा प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभागाने आर्थिक वर्षाची तरतूद आणि वितरणाचे कालबद्ध नियोजन करावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती वितरण प्रणाली विकसित करण्यासाठी प्रारूप तयार करून मान्यतेसाठी तातडीने सादर करावे, असेही त्यांनी निर्देश दिले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठित करून नवीन समाजकार्य महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्याबाबत आराखडा तयार करण्यास तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठास बी.एससी. एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्कृत आणि भारतीय ज्ञानप्रणालीशी संबंधित अभ्यासक्रमाची सांगड घालून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 

विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन बार कौन्सिल ऑफ इंडियाची ना हरकत प्रमाणपत्र मिळेल अशा विधी महाविद्यालयांना मान्यता देण्यात यावी, असेही निर्देश दिले. तसेच, एआयसीटीई, यूजीसी, बीसीआय आणि एनसीटीई मान्यता देणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय पदविका, नवीन पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समिती गठित करून उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण अंतर्गत कुशल व काळानुरूप अभ्यासक्रम तयार करावेत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

 

ज्या महाविद्यालयांचे नॅक मानांकन ‘अ’ ग्रेडचे आहे, अशा निवडक खासगी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी नमूद केले.

 

बैठकीत राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी माहिती दिली. ही बैठक उच्च शिक्षण क्षेत्रातील नवीन संधी आणि सुधारणांसाठी मीलाचा दगड ठरेल, असे मत बैठकीतील सहभागींनी व्यक्त केले.

 

टीआयएन२४ संपादक : अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें