महापारेषणच्या नागपुरातील पाचगाव उपकेंद्राचे काम वेळेच्या आधीच पूर्ण – मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
TIN24 संपादक अमित अल्हाट
मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नागपूर परिमंडळांतर्गत २२० के. व्ही. पाचगाव उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो विद्युत वाहिनी (२२ सर्किट कि. मी.) निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिने अगोदरच पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महापारेषणचे कौतुक केले आहे.
ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाचगाव येथील २२०/३३ के. व्ही. उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो वाहिनी निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.
नागपूर ग्रामीण भागाला विद्युत पुरवठ्यात मोठा दिलासा
२२०/३३ के.व्ही. पाचगाव उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका आणि लगतच्या नागपूर ग्रामीण भागातील घरगुती तसेच औद्योगिक विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपकेंद्रामुळे विद्युत ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी महापारेषणच्या प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. विद्युत प्रकल्प उभारणीत परवानाधारक पारेषण कंपनींना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वीजप्रकल्प उभारणीची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होत नाहीत. वीजवाहिनीच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये न्यायालयीन प्रकरणे, वनविभागाची परवानगी, रेल्वे क्रॉसिंगची परवानगी, महामार्ग विभागाची परवानगी, आदी अडचणींमुळे प्रकल्पांच्या कामाच्या गतीवर परिणाम होतो.
महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सतीश अणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमूने २२० के.व्ही. पाचगाव उपकेंद्र व वाहिनीचे काम कार्यपूर्ती कालावधीच्या तब्बल ८ महिन्याआधी पूर्ण करून नविन रेकॉर्ड केले आहे.
प्रकल्पाची वेळेच्या आधी पूर्णता: तपशील
प्रकल्पाचे कंत्राट कार्यादेश दि. २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशन, रत्नागिरी या कंपनीला देण्यात आले. या प्रकल्पाचे काम दि. ११.०४.२०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. परंतु, अतिउच्च दाब प्रकल्प प्रविभाग नागपूरचे अधीक्षक अभियंता श्री. जयवंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. जयेश कोल्हे आणि श्री. संजय वाढवे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हा प्रकल्प दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजे तब्बल ८ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित होऊ शकला.
उपकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री. प्रविणकुमार दामके, श्री. निशित किरोलीकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. अनिल सावरकर, श्री. भूषण खांडेकर यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांच्या हस्ते प्रकल्पाचे कंत्राटदार मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशनचे संचालक श्री. प्रकाश देशमुख यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला.
महापारेषणचे नावीन्यपूर्ण उपक्रम: डॉ. संजीव कुमार
संभाव्य विजेची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) अति उच्च दाब प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना आणि नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वेक्षण आणि अंमलबजावणी वेळेत आणि अचूक केल्यामुळे आता प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, असे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी सांगितले.
भविष्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण: श्री. अविनाश निंबाळकर
सध्या विजक्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. त्या दृष्टीने पॉवरग्रीडनंतर महापारेषण कंपनी २०० कोटींच्या वरील सर्व टी.बी.सी.बी. प्रकल्पामध्ये भाग घेऊन ते सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याचे महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांनी सांगितले आहे.
TIN24
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
