वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती : अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा, केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती : अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा, केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. ८ : TIN24 एडिटर अमित अल्हाट

 

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय गवळी, अधीक्षक अभियंता महादेव कदम, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ अमरावतीचे अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, प्रकल्पाची तपासणी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत करून सविस्तर प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा. तसेच, या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी. यासाठी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून, प्रकल्पाच्या किमान २५ टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळवता येईल का यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. राज्य शासनाकडूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते निम्न वर्धा सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रकल्पाची व्याप्ती आणि फायदे

हा प्रकल्प विदर्भातील १० लाख एकर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणारा क्रांतिकारी उपक्रम आहे. राज्याच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, त्याची अंदाजित किंमत ८८,५७४ कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर शेतजमिनीला फायदा होईल, ज्यामुळे कोरडवाहू जमिनी कायमस्वरूपी सिंचनाखाली येतील. शेतकऱ्यांना वर्षभर पिके घेता येतील आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे.

 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, हा प्रकल्प केवळ सिंचन प्रकल्प नसून, भविष्यातील परिवर्तनकारी योजना ठरणार आहे. वैनगंगा नदीतील पाणी नळगंगा नदीशी जोडून विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होईल. प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) ची तयारी अंतिम टप्प्यात असून, अमरावती विभागाला जास्त हिस्सा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संत्रा उत्पादकांसाठी विशेष मदतही जाहीर करण्यात आली आहे.

 

विदर्भातील जलक्रांतीचा मार्ग मोकळा

भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भाचा कायापालट होईल. गोसीखुर्द प्रकल्पापासून निम्न वर्धा पर्यंतचा पहिला टप्पा लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. पर्यावरण मान्यता मिळवण्यासाठीही वेगाने पावले उचलली जात आहेत. या प्रकल्पामुळे शेती उत्पादन क्षमता वाढेल आणि जल व्यवस्थापनाच्या आव्हानांना तोंड देता येईल.

 

हा प्रकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी संघटना आणि स्थानिक नेत्यांकडून या प्रकल्पाचे स्वागत होत असून, लवकरात लवकर काम सुरू व्हावे अशी मागणी आहे. TIN24 आपल्या वाचकांसाठी या प्रकल्पावरील अपडेट्स देत राहील.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें