एससी/एसटी कायद्याचा अवमान: नागपाडा पोलिसांची निष्क्रियता उघड, अमित आल्हाट यांचे ‘वन मॅन प्रोटेस्ट’
### स्वातंत्र्यदिनी ‘एक व्यक्तीचा अन्यायाविरोधात आंदोलन’: अमित आल्हाट यांचा नागपाडा पोलिसांविरोधात बंड
**मुंबई, १३ ऑगस्ट २०२५:** स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एका व्यक्तीच्या अन्यायाविरोधातील लढाईने नवे वळण घेतले आहे. अमित आल्हाट या व्यक्तीने एससी/एसटी कायद्याच्या कलम १८अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नागपाडा पोलिस ठाण्याने टाळाटाळ केल्यामुळे आणि दीर्घकाळ न्याय मिळत नसल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी ‘एक व्यक्तीचा अन्यायाविरोधात आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन हुतात्मा चौक येथून सुरू होऊन आझाद मैदानावर उपोषणाच्या रूपात सुरू राहणार असून, न्याय मिळेपर्यंत ते थांबणार नाही, असे आल्हाट यांनी सांगितले.
अमित आल्हाट हे एससी/एसटी कायद्याच्या कलम १८अ अंतर्गत तक्रारदार आहेत. त्यांच्या आरोपानुसार, अतुल प्रल्हाड पाटील, डीसीपी मोटर ट्रान्सपोर्ट विभाग, यांनी जातीय अत्याचार केले आहेत. पाटील यांनी आल्हाट यांना ‘ये मांगटया’ अशी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नावाने विनापरवाना गैरहजर नोंदी करून त्या प्राथमिक आणि विभागीय चौकशीत वापरल्या. हे सर्व आल्हाट यांच्या नोकरीत अडथळा निर्माण करण्यासाठी आणि जातीद्वेषातून केले गेले, असा आरोप आहे.
आल्हाट यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस अधिनियमाच्या कलम १० अन्वये पोलिस आयुक्त हे त्यांचे नियुक्ती अधिकारी आहेत. तरीही अतुल पाटील यांनी पदाचा गैरवापर केला. डीसीपी मुंबई एमटी यांना पोलिस अधिनियमाच्या कलम २५ अन्वये शिक्षा देण्याचा अधिकारच नाही, तरीही त्यांनी कायद्याचा गैरवापर करून जातीयवाद दाखवला. या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही आणि सातत्याने पाठपुरावा करूनही नागपाडा पोलिस ठाण्याने प्रकरण दाबले आहे. आरोपी अतुल पाटील हे पोलिस अधिकारी असल्यामुळे एससी/एसटी कायद्याच्या कलम १८अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास मनाई केली जात आहे, असा गंभीर आरोप आल्हाट यांनी केला आहे.
दिनांक ८ ऑगस्ट रोजी नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप काळे यांनी सांगितले की, ते या प्रकरणी कायदेशीर मत घेत आहेत आणि आंदोलन मागे घ्या. मात्र, गेल्या ७ महिन्यांपासून पोलिस कायदेशीर मत घेत असल्याचे सांगून वेळ मारून नेले जात आहे, असा आक्षेप आल्हाट यांनी घेतला. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, एससी/एसटी कायद्याच्या कलम १८अ ची योग्य अंमलबजावणी गृह विभागातून होत नसल्याचे दिसते. बॉम्बे हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाच्या या कलमासंदर्भातील आदेशांचा अवमान होत आहे. मी याबाबत भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्राद्वारे कळविले आहे.”
आल्हाट यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचा वापर करून हे आंदोलन सुरू करत आहे. पोलिस प्रशासन कायद्याने चालते आणि त्यावर सरकारचा अंकुश असतो, मात्र राज्य सरकारने एससी/एसटी कायद्याच्या कलम १८अ बाबत पोलिसांना मनमानी कारभार करण्यास मोकळीक दिल्याचे दिसते. संपूर्ण राज्यात पोलिस प्रशासनाकडून या कलमाबाबत निष्क्रियता आहे, ज्याची जबाबदारी फडणवीस सरकारची आहे.
हे आंदोलन नागपाडा पोलिस ठाण्याविरोधात असून, पोलीस आयुक्तालय मुंबई येथून सुरू होईल आणि आझाद मैदानावर उपोषण केले जाईल. आल्हाट यांनी प्रेस, मीडिया चॅनेल आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, माझ्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करावे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हॅशटॅग: #अमितआल्हाटलान्यायकडे
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
