मुंबई, दि. ११ : ‘एआय’ हे केवळ संगणकीय साधन नाही, तर मानवी बुद्धीच्या विचारप्रक्रियेचे आधुनिक रूप आहे. ‘एआय’चा योग्य वापर केल्यास कामे अधिक सुलभ आणि प्रभावी होऊ शकतात, असे स्पष्ट मत कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ किशोर जस्मानी यांनी मांडले.

मंत्रालयात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त तत्वावधानात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांसाठी चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ‘जनरेटिव्ह एआयच्या युगात डिजिटल कंटेंट निर्मिती’ या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ किशोर जस्मानी बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ किशोर जस्मानी म्हणाले की, १९५६ मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही संकल्पना उदयास आली आणि त्यानंतर मशीन शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु गेल्या दशकात ती समजून घेणे आणि निर्णय घेणे शिकली आहे. ‘एआय’ प्रचंड प्रमाणातील डेटावरून शिकते. लाखो पुस्तके, अब्जावधी लेख आणि डिजिटल माहितीच्या आधारावर ती ज्ञान आत्मसात करते. उदाहरण द्यायचे तर, काही एआय मॉडेल्स रोज १ कोटीपेक्षा जास्त लेख वाचतात आणि त्यावर आधारित उत्तर तयार करतात. ‘एआय’ला जितकी अचूक माहिती पुरवली जाईल, तितके अचूक निकाल ती देते. म्हणजे मानव जितका जागरूक, ‘एआय’ तितकीच बुद्धिमान होते. एआयचा रोजच्या जीवनातील वापर – आज बहुतेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स एआयवर अवलंबून आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ किशोर जस्मानी पुढे म्हणाले की, तुमच्या खरेदीच्या आवडीनिवडींवरून डिजिटल प्लॅटफॉर्म्स तुम्हाला उत्पादने सुचवतात. अॅलेक्सा आणि सिरीसारखी साधनेही याच पद्धतीने कार्य करतात. आरोग्यसेवा, बँकिंग आणि अर्थव्यवस्था, शिक्षण, सादरीकरणे, स्वयंचलित वाहने ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. एआय हा मानवाचा विकल्प नाही, तर सहकारी आहे. एआयच्या विस्तारामुळे अनेकांना रोजगार गमावण्याची चिंता आहे. मात्र, ‘एआय’ हा स्पर्धक नव्हे, तर सहाय्यक आहे. जो एआयला समजून घेईल आणि वापर शिकेल, तो आपल्या क्षेत्रात अधिक कुशल आणि यशस्वी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
TIN24 संपादक अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
