TIN24 संपादक अमित अलहट
मुंबई, दि. २२: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात रुजवण्यासाठी आणि प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी राज्यभरात येत्या ३६५ दिवसांत १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने दिवाळीच्या मंगलमय स्वागतासाठी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात “दीप उत्सव दिवाळी पहाट” हा अविस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भारतरत्न आशा भोसले आणि स्वरसम्राट सुधीर फडके (बाबूजी) यांच्या सदाबहार गीतांची स्वरमयी मैफल रंगली. रसिक प्रेक्षकांनी या सुवर्णसंधीचा मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, तसेच गायिका शाल्मली सुखटणकर आणि प्राजक्ता सातर्डेकर यांनी आपल्या मधूर आणि भावस्पर्शी गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या प्रत्येक सुराने सभागृह चैतन्याने भारले होते. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांनी संगीत संयोजन केले.

याप्रसंगी आमदार मनोज कोटक, नगरसेवक प्रभाकर शिंदे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी आणि नगरसेविका स्मिता कांबळे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. मुलुंडकर रसिकांनी या “दीप उत्सव दिवाळी पहाट” कार्यक्रमाला उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे कार्यक्रम अधिकच यशस्वी झाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे हे दर्शन उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
