TIN24 | संपादक अमित अल्हाट

मंत्रिमंडळाने मंजूर केला ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्प.
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थानांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या (एमएसआयडीसी) माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्याद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचे विकसन होणार आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च २० हजार कोटी रुपये आहे.
या टाऊनशिपसाठी आवश्यक ३० टक्के निधी शासनाकडून पुरवण्यात येणार आहे, तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसीमार्फत विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात उभारण्यात येईल.
तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेसाठी महामंडळाला १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आधुनिक व सुसज्ज निवासाची सुविधा मिळेल आणि त्यांचे कार्यक्षमतेत वाढ होईल.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षेची गरज वाढली असून, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत वसाहतीची मोठी आवश्यकता भासत आहे. सध्या मुंबई पोलीस दलात ५१,३०८ इतके मनुष्यबळ कार्यरत आहे.
मात्र, उपलब्ध २२,९०४ सेवा निवासस्थानांपैकी सुमारे ३,७७७ निवासस्थाने ब्रिटीशकालीन जुन्या व जीर्ण इमारतींमुळे वापरासाठी अयोग्य ठरली आहेत. दरमहा ४०० ते ५०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी अर्ज सादर करतात, पण उपलब्ध नसल्याने त्यांना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो.
पोलीसांच्या कामाच्या स्वरूपामुळे कार्यालयाजवळ निवास आवश्यक असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल. यामुळे अधिकारी व कर्मचारी अधिक तत्परतेने कर्तव्य बजावू शकतील आणि कुटुंबासह सुरक्षित जीवन जगू शकतील.
हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासात मीलाचा दगड ठरेल. पोलीस दलाच्या कल्याणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
