TIN24 संपादक अमित अल्हाट
सोयाबीन, उडीद, मूग आणि तुरीच्या विक्रमी खरेदीला हिरवा कंदील; शेतकऱ्यांना MSP चा थेट फायदा

नवी दिल्ली, २८ : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील डाळी आणि तेलबिया पिकांच्या खरेदीला ₹१५,१०० कोटी रुपयांच्या विक्रमी निधीसह मंजुरी दिली आहे.
या योजनेद्वारे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळेल आणि बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळेल. श्री. चौहान यांनी आज या राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) अंतर्गत या योजनांना अंतिम स्वरूप दिले.
महाराष्ट्रासाठी मूल्य समर्थन योजना (PSS) अंतर्गत ही खरेदी अभूतपूर्व आहे. राज्यात १८,६०,००० मेट्रिक टन सोयाबीन, ३,३०,००० मेट्रिक टन उडीद आणि ३५,००० मेट्रिक टन मूग यांची खरेदी मंजूर झाली आहे. यासाठी अनुक्रमे ₹९,९०० कोटी, ₹२,५५० कोटी आणि ₹२९० कोटी खर्च अपेक्षित आहे. ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी PSS योजना ठरली आहे.
ओडिशात तुरीच्या १००% उत्पादनाची खरेदी मंजूर करण्यात आली आहे. तेलंगणात उडीदच्या १००% खरेदीसोबत सोयाबीन आणि मूग (उत्पादनाच्या २५%) ची खरेदी होईल. मध्य प्रदेशात सोयाबीनसाठी २२,३०,००० मेट्रिक टन खरेदी अंतर्गत मूल्य तफावत भरपाई योजना (PDPS) साठी ₹१,७८० कोटींची तरतूद आहे.
बैठकीत बोलताना श्री. चौहान म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि बाजारातील जोखमींपासून वाचवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. आता तूर, उडीद आणि मसूरची १००% उत्पादन खरेदी
‘नेफेड’ (NAFED) आणि ‘एनसीसीएफ’ (NCCF) द्वारे होईल, ज्यामुळे भारत डाळ उत्पादनात स्वावलंबी बनेल. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी खरेदी प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24