पदार्थ विरोधी गुन्ह्यांतील कारवाईत झिरो टॉलरन्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
TIN24 विशेष : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल
संपादक : अमित अल्हाट
मुंबई, दि. 21 : कोणतीही महासत्ता कायदा सुव्यवस्थेशिवाय उभी राहू शकत नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षणाबरोबरच अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यासंदर्भात राज्य शासनाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या 10 व्या स्थापना दिनानिमित्त “भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना” या विषयावर चर्चासत्राचे मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असीम अरूण, इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर.एस. माशारी, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह, राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस दलातील सुधारणा आणि अभिमान :
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे. पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनीय बाब असून, पोलीस दलात आणखी चांगले बदल घडविण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचार मंथन महत्वपूर्ण ठरेल. या विचारमंथनातून येणाऱ्या नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल.
काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे 2023 मध्ये पोलीस दलाची नवीन संघटनात्मक रचना तयार करून नाविन्यपूर्ण सुधारणांवर भर दिला आहे. भारतीय संविधानात चेक अँड बॅलन्सची तरतूद असून अनेक अधिकाऱ्यांनी उपलब्ध कायद्यांचा वापर करून परिवर्तनशील सुधारणा केल्या आहेत. आयपीसी, सीआरपीसी व इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हे इंग्रजांच्या काळातील कायदे असल्याने लोकशाहीच्या अधिष्ठानावर त्यात आवश्यक बदल करण्यात येत आहेत. हे नवीन फौजदारी कायदे नागरिकांमध्ये कायद्यावरील विश्वास व न्यायव्यवस्थेबद्दल सकारात्मकता निर्माण करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा :
पोलीसांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यासपीठांचा वापर करणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक ठरले आहे. सोशल मीडिया व इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे गुन्हेगारी वाढत असून, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल ट्रॅकिंग, ऑनलाईन गुन्ह्यांवर जलद प्रतिसादासाठी विशेष असे नव तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी महाराष्ट्रात देशातील प्रगत अशी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे. इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे. एआयच्या सहाय्याने गुंतागुंतीची गुन्हे प्रकरणे अधिक वेगाने सोडविण्यात मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अंमली पदार्थ विरोधात राज्य शासनाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले आहे. अंमली पदार्थांच्या व्यवहारात आढळलेल्यांवर कठोर कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्था आणि आव्हाने :
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था कृषी आधारित होती. आताही कृषी क्षेत्र तेवढेच महत्वाचे असून, बदलत्या काळानुरूप सेवा क्षेत्रावरही आपल्या अर्थव्यवस्थेचे अवलंबित्व वाढत आहे. कृषी व सेवा या दोन्ही क्षेत्रावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेची आव्हाने वेगळी आहेत. त्यामुळे बदलत्या सेवा क्षेत्राची परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच शाश्वत मूल्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न होणेही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
चर्चासत्रातील प्रमुख विषय :
यावेळी ‘गुंतवणूक परिसंस्थेत विश्वास आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन’, आणि ‘डिजीटल सीमांचे संरक्षण : धोरणात्मक पोलिस-उद्योग सहकार्याची गरज’ या विषयांवर चर्चा करण्यात आली.
(TIN24 न्यूज नेटवर्कद्वारे संकलित आणि संपादित. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.)
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
