TIN24 EDITOR AMIT ALHAT
गोंदिया, दि. २० ऑक्टोबर २०२५: गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार आणि राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री महादेवरावजी शिवणकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

उद्या सकाळी १० वाजता त्यांच्यावर साकरीटोला घाट, सालेकसा रोड आमगाव येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या पाठीमागे दोन पुत्र विजय आणि संजय शिवणकर, नातवंड असा परिवार आहे.
महादेवराव शिवणकर यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली असून, त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
महादेवराव सुकाजी शिवणकर यांची एकूण वाटचाल
महादेवराव शिवणकर यांचा जन्म ७ एप्रिल १९४० रोजी आमगाव, जिल्हा गोंदिया येथे झाला. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एम.ए. (इतिहास) पर्यंत शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने शेतकरी असलेले ते माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास) होते आणि भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्न) येथे सेवा बजावली. २६ जुलै १९७५ रोजी आणिबाणीकाळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
राजकीय वाटचाल
१९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत अजिंक्य राहिलेले शिवणकर १९७८ ते १९८९ (तीन वेळा आमगाव विधानसभा) आणि १९९४ ते २००४ (दोन वेळा आमगाव विधानसभा) पर्यंत विधानसभा सदस्य होते. १९९९ ते २००४ या काळात ते कॅबिनेट मंत्री म्हणून पाटबंधारे, वित्त व नियोजन विभाग सांभाळले. संसद सदस्य म्हणून १९८९ ते १९९४ आणि २००४ ते २००८ पर्यंत सेवा दिली. २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर त्यांनी संसदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
त्यांनी लिहिलेली पुस्तके: १) गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायरी), २) भारताची आर्थिक स्थिती (मराठी), ३) विदर्भ झालाच पाहिजे (मराठी), ४) केनिया सफारी (मराठी). याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांनी १०० च्या जवळपास लेख लिहिले.
महादेवराव शिवणकर यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यातील विकासकार्य थांबले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
