TIN24 संपादक : अमित आल्हाट

चंद्रकांतदादा पाटील यांचा थेट आदेश –
३० नोव्हेंबरपर्यंत सर्व विद्यापीठांचा डॅशबोर्ड १००% पूर्ण कराच.
मुंबई, दि. १७ : विकसित महाराष्ट्र २०४७ च्या दृष्टीक्षेपाला साकार करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचे ठोस निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सर्व विद्यापीठांना दिले. प्राध्यापक भरती, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज आणि एकूण कार्यक्षमता यांचा एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे परिपूर्ण करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
मुंबई विद्यापीठात आज “विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप २०४७ व उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन : विद्यापीठांची भूमिका व योगदान” या विषयावर झालेल्या विशेष परिषदेत मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांच्यासह राज्यातील सर्व कुलगुरू व प्र-कुलगुरू उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,
“डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक विद्यापीठाला किमान दोन सदस्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले जाईल.
हे पथक प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन माहिती तपासेल, मार्गदर्शन करेल आणि आकडेवारी निर्दोष राहील याची खात्री करेल. दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक घेतली जाईल. यातून उत्तम परिणाम नक्कीच मिळतील.”
ते पुढे म्हणाले, “वंदे मातरम् गीताला येत्या वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्व विद्यापीठांनी विशेष सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित करावेत.”
अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनीही डॅशबोर्डमधील माहिती पूर्णतः अचूक आणि त्रुटीमुक्त असावी यावर भर दिला. ते म्हणाले, “सर्व प्रलंबित मुद्दे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढावेत. एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती उपलब्ध होणे हे या डॅशबोर्डचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने स्वतःचा डॅशबोर्ड तपशीलवार तपासावा.”
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, प्राध्यापक भरतीला गती आणि शैक्षणिक गुणवत्तेचे उन्नयन घडवून आणण्यासाठी हा डिजिटल डॅशबोर्ड केंद्रबिंदू ठरणार आहे. पुढील १३ दिवस राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
