शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 संपादक अमित अल्हाट

नवी मुंबई, १७ ऑक्टोबर २०२५: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांचा समावेश युनोस्कोने नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केला असून हा आनंद व अभिमान साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमृत ‘दुर्गोत्सव २०२५’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिवाळी सण साजरा करताना किल्ले बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी दुर्गांची प्रतिकृती बनविणा-या समुहांना मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमाला जोड देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.

शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता दि. १२ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत https://www.durgotsav.com/ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपले नाव व इतर तपशीलासह फॉर्म भरून नोंदणी करावयाची आहे. त्या अनुषंगाने रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग अशा युनोस्काने जाहीर केलेल्या बारापैकी आपण बनविलेल्या एका दुर्गासोबतचे सेल्फी छायाचित्र काढून ते त्याच डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करावयाचे आहे. या छायाचित्राची अमृत संस्थेमार्फत वैधता पडताळणी सिध्द झाल्यानंतर भाग घेणा-या प्रत्येकास शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे ‘अभिनंदन पत्र’ डिजीटल स्वरूपात प्रदान केले जाणार आहे.

दुर्गोत्सवासाठी बनविलेल्या दुर्ग प्रतिकृतीसाठी नागरिकांना अधिक प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ जाहीर केली असून उत्तम दुर्गनिर्मिती करणा-या समुहांना प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानीत केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागाकरिता https://q.me-qr.com/wlRTYWOz या लिंकवर जाऊन स्पर्धा सहभागाचा अर्ज भरावयाचा असून दुर्गाच्या प्रतिकृतीमध्ये माती, दगड, पुठ्ठा, लाकूड, कागद, गवत, रांगोळी असे पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्य वापरण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच बनविलेल्या दुर्गाविषयीचा संक्षिप्त इतिहास फलकावर प्रदर्शित करणेही आवश्यक आहे.

ही स्पर्धा ‘शालेय गट’ तसेच ‘संस्था, मंडळे, सोसायट्या यांचा खुला गट’ अशा दोन गटांमध्ये होणार असून दोन्ही गटांना स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. याकरिता नागरिकांनी https://q.me-qr.com/wlRTYWOz या डिजीटल प्लॅटफॉर्मवर २२ ऑक्टोबर २०२५ रोजी, सायं. ५ वा. पर्यंत माहिती भरून प्रवेशअर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच या लिंकवर आपण बनविलेल्या दुर्गाचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व वरील बाजूने संपूर्ण दुर्ग दिसेल असे एक छायाचित्र अशाप्रकारे एकूण ५ छायाचित्रांची पीडीए फाईल अपलोड करावयाची आहे.

सदर छायाचित्रांच्या आधारे प्राथमिक फेरीचे परीक्षण होणार असल्याने छायाचित्रांमध्ये दुर्गाची प्रतिमा स्पष्ट व ठळक दिसेल याची काळजी घ्यायची आहे. छायाचित्रामधून संपूर्ण दुर्गाच्या प्रतिकृतीची माहिती मिळेल यादृष्टीने छायाचित्रे सादर करावयाची आहेत.

या प्राथमिक फेरीमधून दोन्ही गटांकरिता स्वतंत्र दुर्गांची निवड अंतिम फेरीकरिता दि. २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून महानगरपालिकेची परीक्षण समिती दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रत्यक्ष जागी जाऊन दुर्ग प्रतिकृतींची पाहणी करणार आहे. अंतिम फेरीप्रसंगी परीक्षण समितीसमोर दुर्गाबाबत २ मिनीटांचे माहितीप्रद मौखिक सादरीकरण करणेही महत्वाचे आहे.

ऐतिहासिक अचूकता, कलात्मकता व सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता, सांघिक भावना व समन्वय, सादरीकरणाची पद्धत, स्वच्छता व बांधकामाची अचूकता, साहित्याचा प्रभावी वापर, परिसर व सजावट, सर्वांगीण छाप अशा १० निकषांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ९८१९५५५२२० अथवा ९००४७६१६४० या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

तरी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुर्गोत्सव उपक्रमात प्रामुख्याने विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन युनोस्कोने जाहीर केलेल्या १२ दुर्गांपैकी एक दुर्ग प्रतिकृती निर्माण करावी व दिवाळीमध्ये किल्ले बनविण्याच्या आपल्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक विक्रम करण्यात आपला सहभाग द्यावा, याकरिता आपल्या नवी मुंबई शहरात जास्तीत जास्त दुर्ग प्रतिकृती निर्मिती व्हावी यादृष्टीने आयोजित केलेल्या दुर्गबांधणी स्पर्धेतही सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें