दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा; नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नवी मुंबई: दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून या कालावधीत स्वच्छता, प्रदूषण प्रतिबंध, प्लास्टिक पिशव्यांच्या व एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर प्रतिबंध या बाबींकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. त्याचप्रमाणे हा दीपावली उत्सव स्वच्छ, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक साजरा करावा असे नागरिकांना आवाहन केले आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीमध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यामध्ये ऑनलाईन कार्यप्रणालीवर भर देण्याचे सूत्र महानगरपालिकेने स्विकारलेले असून त्यानुसार मालमत्ता कर, पाणी पट्टी भरण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे न लागता घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर ऑनलाईन भरणा करता येतो याची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहचवावी व जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले.

त्याचप्रमाणे ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीव्दारे प्राप्त होणा-या तक्रारी, सूचना यांचा विभागनिहाय आढावा घेताना आयुक्तांनी तक्रार निराकरणाच्या कार्यवाहीला अधिक वेग द्यावा व तक्रारीवर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती संबंधित नागरिकांना देण्यात यावी असेही निर्देशित केले. प्रत्येक विभागप्रमुखाने त्याच्या विभागाशी संबधित कामकाजावर नियमीत निरीक्षण व नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने डॅश बोर्ड बनवून घ्यावेत व त्यानुसार कार्यप्रणालीत वेग आणावा असेही आयुक्तांनी सूचित केले.

बांधकाम पूर्ण झालेली मार्केट वापरात आणण्याच्या कार्यवाहीला त्यामधील अडचणी दूर करुन वेग द्यावा व याकडे संबधित विभाग अधिकारी आणि परिमंडळ उपआयुक्त यांनी बारकाईने लक्ष द्यावे असेही निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे या मार्केटमध्ये महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध्‍ करुन द्यावी असेही सूचित करण्यात आले.

आता पावसाच्या उघडिपीनंतर उष्ण वातावरणामुळे रस्त्यांकडेचा चिखल वाळल्याने धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून त्यादृष्टीने सखोल स्वच्छता करण्याचा वेग वाढवून व हवाप्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवून या वर नियंत्रण आणण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

यासोबतच पावसाळी कालावधीत झालेले खड्डे बुजवून रस्ते सुधारण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दिवाळी सणानिमित्त फटाके विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या परवानग्यांमुळे वाहतुकीला व सुरक्षेला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही याची खातरजमा करुन नागरिकांना यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन उचित कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी विभाग अधिकारी व अग्निशमन अधिकारी यांना दिले.

केंद्र शासनाची भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना अंतर्गत सुधारणांबाबत करावयाच्या कार्यवाहीचाही संबधित विभागनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. तसेच नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदारयादी विषयक कामकाजाची माहिती व सद्यस्थिती आठही विभाग अधिकारी व निवडणूक उपआयुक्त यांचेकडून आयुक्तांनी जाणून घेतली.

नवी मुंबई हे स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जाते. यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या पर्यावरणशील कृतीचा फार मोठा वाटा आहे.

नुकताच नवी मुंबई महानगरपालिकेला पर्यावरण संवर्धन, सांडपाणी पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘हरित यशोगाथा सन्मान – सर्वांगीण उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आलेले आहे.


TIN24 EDITOR AMIT ALHAT

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें