स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान: महिलांच्या आरोग्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरे ..
स्त्रीशक्तीला आरोग्याची साथ, विकसित भारताचा पाया मजबूत होणार
मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२५ (TIN24) – महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे केंद्रबिंदू आहे. याच उद्देशाने केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभर राबविले जाणार आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी केले जाईल.
महाराष्ट्रात या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह, नरिमन पॉइंट येथे हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ तसेच इतर मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आणि सेवा
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरे (AAM-SHC), ग्रामीण रुग्णालये (CHCs), प्राथमिक आरोग्य केंद्रे (AAM-PHC/UPHC) आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये हे शिबिरे राबविले जातील.
शिबिरांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख सेवांचा समावेश असा आहे:
१. महिलांची आरोग्य तपासणी: उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया आणि आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी. यासोबत समुपदेशन आणि कार्ड वाटप केले जाईल.
२. माता आणि बाल आरोग्य सेवा: गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC), हिमोग्लोबिन तपासणी, पोषण समुपदेशन आणि बालकांचे लसीकरण.
३. आयुष सेवा: आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिद्ध आणि नॅचरोपॅथी यासारख्या पर्यायी उपचार पद्धती उपलब्ध करणे.
४. जनजागृती आणि वर्तणूक बदल: किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण जागृती, महिला बचत गटांद्वारे खाद्यतेल व साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन.
५. रक्तदान शिबिरे: १ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त १ लाख युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट. इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यासारख्या संस्थांच्या सहाय्याने रक्तदात्यांची नोंदणी आणि My Gov पोर्टलद्वारे रक्तदान प्रतिज्ञा.
६. नोंदणी आणि कार्ड वाटप: आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) आणि आयुष्मान वय वंदना कार्ड वाटप.
७. क्षयरोग निर्मुलन: निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी, क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषक आहार उपलब्ध करणे. आवश्यक रुग्णांना विशेषज्ञ तपासणी, रक्त/लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे आणि शस्त्रक्रिया मोफत.
दि. १७ सप्टेंबरला राज्यभरात ७५ उपक्रम
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये विविध शिबिरे आयोजित केली जातील. यात असंसर्गजन्य रोग तपासणी, मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता-बाल आरोग्य, पोषण जागृती, आयुष आणि योग, क्षयरोग जागृती, रक्तदान, अवयवदान प्रतिज्ञा, मोफत औषध वितरण, निदान शिबिरे, कर्करोग जागृती, मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती सत्रे, किशोरवयीन आरोग्य, शालेय तपासणी, स्वच्छता जागृती, आरोग्य मेळावे आणि दुर्गम भागांसाठी टेलिमेडिसिन यांचा समावेश आहे.
सहभागी संस्था आणि केंद्रे
राज्यातील १०,७६६ उपकेंद्रे, १९३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, १,०४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, ३७२ ग्रामीण रुग्णालये, १०२ उपजिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २२ स्त्री रुग्णालये, २ संदर्भ सेवा रुग्णालये आणि १९ जिल्हा रुग्णालये यात सक्रिय सहभाग घेणार आहेत. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये, महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिक संघटना सहभागी होणार आहेत.
हे अभियान महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन सशक्त परिवार आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
TIN24 संपादक: अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
