सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ. निपुण विनायक..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ. निपुण विनायक..

मुंबईत युनिसेफ आणि PIB यांच्या संयुक्त कार्यशाळेत आरोग्य तज्ज्ञांची चर्चा; असंसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर

 

TIN24 संपादक अमित अल्हाट

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासोबतच असंसर्गजन्य आजारांबाबत अधिक सजगता दाखवत विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. हे मत आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

 

युनिसेफ इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजारांवरील राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. निपुण विनायक यांच्यासह PIB पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, AIIMS नागपूरचे मुख्य संचालक डॉ. प्रशांत जोशी, युनिसेफचे महाराष्ट्र प्रमुख संजय सिंग आणि विवेक सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

डॉ. विनायक यांनी सांगितले की, बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी विभागाने विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भारपणाच्या काळापासूनच काळजी घेण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे भविष्यात अशा आजारांना प्रतिबंध घालता येईल. त्यांनी दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, समाजातील सर्व स्तरांपर्यंत, विशेषतः दुर्लक्षित समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

 

यावेळी स्मिता वत्स शर्मा यांनी माध्यमांची भूमिका अधोरेखित करत सांगितले की, सत्य आणि विश्वासार्ह माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हे माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. चुकीच्या किंवा असत्य माहितीमुळे समाजात गैरसमज वाढू शकतात, त्यामुळे माध्यमांनी काळजीपूर्वक सत्य माहितीचे प्रसारण करणे गरजेचे आहे. तसेच, असंसर्गजन्य आजार, आहार, जीवनशैली आणि काळजी यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा राज्यस्तरीय कार्यशाळांमुळे विविध विषयांवर चर्चा होऊन आरोग्य व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यशाळेत युनिसेफ आणि अन्य तज्ज्ञांनी असंसर्गजन्य आजारांची वाढती तीव्रता, लहान वयातील परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा केली. या चर्चेतून बाल आरोग्याला मजबूत करण्यासाठी नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें