TIN24 EDITOR AMIT ALHAT
मुंबई, दि. १२: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांत मजबूत पाया देण्यासाठी शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ सुरू करण्यात आला असून, यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार झाला आहे. प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाने हा कार्यक्रम राबवला जात असून, यामुळे सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा वाढवण्याचे उद्दिष्ट या योजनेत आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील ६२ हजारांपेक्षा अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत खान अकॅडमीची उच्च दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध होईल. ही सामग्री महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी जुळवलेली असून, मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळेल. शिक्षक वर्गात व्हिडिओ वापरून अध्यापन अधिक प्रभावी करता येईल, तर विद्यार्थी शाळेत आणि घरी व्हिडिओ धडे व सराव प्रश्नांद्वारे संकल्पना मजबूत करू शकतील.
या भागीदारीतून इयत्ता सहावी ते दहावीच्या विज्ञान विषयाची सामग्री मराठी आणि इंग्रजीत, तसेच राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध होईल. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी-इंग्रजी अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. शिक्षकांना डिजिटल संसाधनांचा वापर सुलभ व्हावा म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘Khanmigo’ हे अध्यापन सहायक मोफत दिले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळेल.

कार्यक्रमाची अंमलबजावणी शालेय शिक्षण आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाने होईल. जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जबाबदारी सांभाळेल. रियल टाइम डॅशबोर्डद्वारे विद्यार्थ्यांचा वापर, अध्ययन वेळ आणि प्रगती यांचे निरीक्षण केले जाईल, ज्यामुळे पारदर्शकता राहील.

हा कार्यक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देईल आणि जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करेल. भौगोलिक किंवा संसाधनांच्या अडचणी दूर करून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा वाढवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
