आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील ..
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता
मुंबई, दि. १२ (टीआयएन२४ प्रतिनिधी) : राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार रुपयांच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
मंत्री जाधव-पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की, शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
कोकण विभागातील नुकसान आणि मदत
ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे.
रायगड जिल्हा : ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपये.
रत्नागिरी जिल्हा : ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये.
सिंधुदुर्ग जिल्हा : ३३५ शेतकऱ्यांच्या ५०.६४ हेक्टर क्षेत्रासाठी १२ लाख ६३ हजार रुपये.
एकूण १ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या १७७.८३ हेक्टरवरील बाधित पिकांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
नागपूर विभागातील मदत वितरण
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्हा : जूनमध्ये १ शेतकऱ्याच्या ०.४० हेक्टर क्षेत्रासाठी ९ हजार रुपये; जुलैमध्ये ७ हजार ४५० शेतकऱ्यांच्या ४५५९.६२ हेक्टर क्षेत्रासाठी ३९२.८३ लाख रुपये.
वर्धा जिल्हा : जूनमध्ये ८२१ शेतकऱ्यांच्या ४८५.८० हेक्टर क्षेत्रासाठी ४१.५४ लाख; जुलैमध्ये २ हजार ८२७ शेतकऱ्यांच्या २२२४.९१ हेक्टर क्षेत्रासाठी १८९.२२ लाख.
चंद्रपूर जिल्हा : जून व जुलैमध्ये १३ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या ८६२१.०६ हेक्टर क्षेत्रासाठी ७३३.०० लाख रुपये.
विभागीय आयुक्त नागपूर यांनी २१ जुलै २०२५ आणि १८ ऑगस्ट २०२५ रोजी पाठवलेल्या प्रस्तावानुसार ही मदत मंजूर करण्यात आली.
हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील मदत
हिंगोली जिल्हा : जुलै २०२५ मधील नुकसानीसाठी ३९६ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टर क्षेत्रासाठी १८.२८ लाख रुपये (विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार).
सोलापूर जिल्हा : जुलै २०२५ मधील नुकसानीसाठी ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या ५६ हजार ९६१.७३ हेक्टर क्षेत्रासाठी ५९७९.१७ लाख रुपये (विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार).
या मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून पुनर्वसन प्रक्रिया सुलभ होईल, असे मंत्री जाधव-पाटील यांनी नमूद केले.
टीआयएन२४ संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
