राज्यातील दुर्गम भागात नवीन पोलिस चौक्या, विकासकामांना गती
नागपूर, दि. १० | TIN24 प्रतिनिधी

केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या दिशेने महाराष्ट्राने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे, सातत्यपूर्ण विकासकामांमुळे आणि पोलिस दलाच्या धाडसी कारवाईमुळे महाराष्ट्र आज नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणेच्या संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, राज्यातील अतिदुर्गम भागात नवीन पोलिस चौक्या उभारून त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात.
नक्षलवादमुक्त झालेल्या भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलिस चौकी उभारलेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे शक्य झाल्याचे सांगून, गडचिरोली पोलिसांनी जहाल नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एक कोटी रुपयांचे बक्षीस तत्काळ वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यावर भर देण्यात आला.
गडचिरोली येथे नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. पोलिस दलासाठी ३३ नवीन वाहनांच्या खरेदी प्रक्रियेलाही गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष) शीरिंग दोरजे, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक अजय शर्मा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सविस्तर सादरीकरण केले.
नक्षलवाद्यांनी आनंद साजरा केलेल्या ठिकाणीच पोलिस चौकी
८ ऑक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नक्षलवादी हल्ल्यात १७ पोलिस जवान शहीद झाले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी या घटनेचा आनंदोत्सव साजरा केला होता. त्याच ठिकाणी आता पोलिसांनी नवीन पोलिस चौकी उभारली असून, यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे हे प्रतीकात्मक उदाहरण मानले जात आहे.
विकासकामांनी नक्षल चळवळीला ठोस उत्तर
गडचिरोली जिल्ह्यात १७.३० किलोमीटर लांबीच्या धोडराज–निलगुंडा–कवंडे रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. कवंडे पुढे कोरमा नाला पूल आणि बेद्रे पुलाच्या निर्मितीनंतर बिजापूरपर्यंत थेट रस्ता जोडणी देण्यात येणार आहे. तसेच इंद्रावती नदीवर दामरंचा ते सांद्रा मार्गावर ७५० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे.
संपर्क व्यवस्थेसाठी २०२२ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात २७१ मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. त्यानंतर २०२३ ते २०२५ या कालावधीत आणखी ५२१ नवीन मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून, त्यामुळे दुर्गम भागातील दळणवळण क्रांतीकारी स्वरूपात बदलत आहे.
TIN24 | संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
