महाराष्ट्राला ‘पंप स्टोरेज हब’ बनवण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यात आतापर्यंत ५४ उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार, ७६,११५ मेगावॅट क्षमतेचे लक्ष्य

नागपूर, दि. १० | TIN24 प्रतिनिधी

महाराष्ट्राला देशातील प्रमुख पंप स्टोरेज हब बनवण्याचे ठोस लक्ष्य असून राज्यात उभारल्या जाणाऱ्या पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यात ५४ उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून त्यातून ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. या माध्यमातून सुमारे ₹४.०६ लाख कोटींची गुंतवणूक आणि १.२५ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प यांसाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्लू निओ एनर्जी लि., महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि. तसेच न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.

या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश खाडे, नरेंद्र मेहता, चित्रा वाघ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राकडे पश्चिम घाट, मोठी धरणे आणि नैसर्गिक संरचना असल्यामुळे पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. केंद्र सरकारचे भक्कम सहकार्य मिळत असून नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. हे प्रकल्प कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तिन्ही प्रमुख प्रकल्पांची ठळक माहिती :

१) पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प
गुंतवणूकदार : जेएसडब्लू निओ एनर्जी लि.
ठिकाण : ता. भोर (पुणे) व ता. महाड (रायगड)
क्षमता : ५,२०० मेगावॅट
गुंतवणूक : ₹१९,९५० कोटी
रोजगार : ७,०००

वैशिष्ट्य : देशातील सर्वात मोठा पंप स्टोरेज प्रकल्प

२) कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प
गुंतवणूकदार : महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि.
ठिकाण : कोयना, ता. पाटण, जि. सातारा
क्षमता : ४०० मेगावॅट
गुंतवणूक : ₹२,८०० कोटी
रोजगार : २,५००

३) सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प
गुंतवणूकदार : न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा. लि.
ठिकाण : ता. अकोले, जि. अहिल्यानगर
क्षमता : २०० मेगावॅट
गुंतवणूक : ₹१,०५० कोटी
रोजगार : २,०००

या तिन्ही प्रकल्पांची एकूण क्षमता ५,८०० मेगावॅट असून एकूण ₹२३,८०० कोटींची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्माण होणार आहेत.

राज्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचे धोरण २० डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आले असून त्यानुसार हे करार करण्यात आले आहेत. यामुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून महाराष्ट्र ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वेगाने वाटचाल करणार आहे.

— TIN24 EDITOR : अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें