तुळापूर–वढू बुद्रुक विकास आराखड्यास ५३२.५१ कोटींची मंजुरी; ग्रामस्थांच्या सूचना महत्त्वाच्या – मुख्यमंत्री फडणवीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 EDITOR AMIT ALHAT

नागपूर, दि. १० : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) ते समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्ता, भीमा नदीवरील पूल व व्यापक सौंदर्यीकरणाचा समावेश असलेल्या ५३२.५१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या महत्वाकांक्षी विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना तुळापूर व वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या सूचना व अपेक्षा लक्षात घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाच्या विकासात लोकभावनेला सर्वोच्च स्थान असावे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या तुळापूर ते वढू बुद्रुक हे अंतर १४ किलोमीटर असून प्रवासास ३० ते ४० मिनिटे लागतात. भीमा नदीवर पूल उभारल्यास हे अंतर साडेसहा किलोमीटरपर्यंत कमी होईल व भाविकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. हा पूल ‘व्हिविंग गॅलरी’सह उभारण्यात यावा. पुलाची रचना, नदी घाट, प्रकाशयोजना व सौंदर्यीकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देणारे असावे. येथे मार्गदर्शक (गाईड) नेमून त्यांना इतिहासाचे सखोल प्रशिक्षण देण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुलाची रुंदी वाहतुकीस पर्याप्त असावी, तसेच व्हिविंग गॅलरी सर्वसामान्य नागरिकांना सहज पाहता येईल, अशा पद्धतीने निर्मिती करण्याचे निर्देश दिले. प्रस्तावित रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

थोडक्यात विकास आराखडा

तुळापूर येथे बलिदान स्थळी संग्रहालय, ८२ आसनी १०-डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, ३५० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत.

वढू बुद्रुक येथे समाधी स्थळी संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, १२० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत.
तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची ‘व्हिविंग गॅलरी’ उभारली जाणार असून दोन्ही ठिकाणी १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याचीही योजना आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें