TIN24 संपादक : अमित आल्हाट
मुंबई, दि. १० डिसेंबर

राज्यपालांच्या उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनाचा भव्य बीटिंग रिट्रीट.
भारतीय नौसेना दिनानिमित्त मंगळवारी गेटवे ऑफ इंडिया येथे पश्चिम नौसेना कमांडच्या वतीने आयोजित ‘बीटिंग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चा भव्य सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समुद्री शक्ती, अजोड शिस्त आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
हेलिकॉप्टर्सचा रोमहर्षक फ्लाय-पास्ट, नेव्हल सेंट्रल बँडचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण, मौखिक आदेशाविना सलग कवायती, तसेच सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींनी सादर केलेला पारंपरिक ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण गेटवे परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला. नौसेना दिनानिमित्त मुंबईच्या समुद्रातील युद्धनौकांवर आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात ४ डिसेंबर रोजी ‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत कराची बंदरावर भारतीय नौदलाने केलेल्या ऐतिहासिक हल्ल्याच्या शौर्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर हा नौसेना दिन साजरा केला जातो.
कार्यक्रमास पश्चिम नौसेना कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आयएनएस शिकरा हेलिकॉप्टरचा खास फ्लाय-पास्ट व ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. यातून भारतीय नौदलाची प्रगत तंत्रज्ञानाची ताकद आणि युद्धकौशल्य जगासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

गेटवे ऑफ इंडिया आज रात्री खऱ्या अर्थाने ‘भारताचा दरवाजा’ बनला.
राज्यपालांची ‘नेव्ही हाऊस’ येथे मान्यवरांशी भेट
गेटवेवरील कार्यक्रमानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित स्वागत समारंभ आणि चहापान कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नौदल अधिकारी, माजी अधिकारी व सर्व मान्यवरांना नौसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपालांना उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
हा भव्य सोहळा केवळ परंपरांचे जतन करणारा नव्हता, तर नव्या पिढीला देशसेवा, शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा देणारा ठरला.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
