साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई, दि. ८ (TIN24 प्रतिनिधी) : साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन व संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ आणि प्राचीन वास्तूंचे मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनात पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पुढील शंभर वर्षे टिकेल अशी विकासकामे करावीत; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत आढावा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत संगम माहुली, सातारा येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि जमीन विकसित करणे, साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरण, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या स्थळांच्या परिसर विकासाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल अशी मजबूत वास्तू उभारावी. त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावे, स्वच्छता राखावी, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, घाट परिसर विकासाचा तसेच अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदीच्या दुरुस्ती कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊत, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे हे मंत्रालयातून उपस्थित होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले.


TIN24 संपादक अमित आल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें