व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना दोन महिन्यांची मुदत
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा; मागासवर्गीय उमेदवारांना दिलासा
मुंबई, दि. ६ सप्टेंबर २०२५ : राज्यातील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, यामुळे मागासवर्गीय उमेदवारांच्या शैक्षणिक प्रवेशातील अडचणी दूर होणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली.
मंत्री शिरसाट म्हणाले की, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० आणि त्याअंतर्गत अधिसूचित नियम २०१२ नुसार मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय सेवांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, काही उमेदवारांना हे प्रमाणपत्र वेळेत मिळवण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे प्रवेश धोक्यात येऊ नयेत, यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना ही सवलत लागू होईल. प्रवेश निश्चित झालेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसह) उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांची मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार असून, शैक्षणिक क्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, शासन मागासवर्गीयांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि अशा निर्णयांमुळे शिक्षणातील समानता वाढेल.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
