गडचिरोलीत नेत्रआरोग्य क्रांती: ‘स्पेक्स २०३०’ प्रकल्पामुळे आदिवासी भागात जनजागृती व उपचार.
मुंबई : गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि मागास जिल्ह्यांत डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी राज्य सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या संयुक्त प्रयत्नांना गती मिळत आहे. या प्रयत्नांमुळे मुलांचे शिक्षण, तरुणांसाठी रोजगार आणि संपूर्ण समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. WHO च्या ‘स्पेक्स २०३०’ प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता देशभरात नेत्रआरोग्य सेवेच्या दृष्टीने आदर्श ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी WHO मार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात यावा, असे आवाहन केले आहे. हा प्रकल्प राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, WHO आणि वन साईट एसीलॉर लक्सोटिका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गडचिरोलीसह देशातील पाच मागास जिल्ह्यांत राबविला जाणार आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत हा उपक्रम सुरू होणार असून, त्यातून नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध होणार आहेत.
जगभरात २.२ अब्ज लोकांना दृष्टीदोषाचा त्रास असून, त्यातील किमान १ अब्ज प्रकरणे टाळता येऊ शकतात. भारतात जवळपास ५३ टक्के दृष्टीदोष हे अपूर्ण दृष्टीदोष दुरुस्तीमुळे (Refractive Errors) निर्माण होतात. यामध्ये प्रत्येक दहा शाळकरी मुलांपैकी एका मुलाला दृष्टीविषयक समस्या भेडसावते. या पार्श्वभूमीवर WHO ने ‘स्पेक्स २०३०’ ही योजना सुरू केली असून, २०३० पर्यंत सर्वसामान्यांना स्वस्त व दर्जेदार चष्म्यांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत गडचिरोलीसह आसाम (धुब्री), ओडिशा (कलाहांडी), राजस्थान (अलवर) आणि उत्तर प्रदेश (प्रयागराज) या राज्यांतील निवडक भागांमध्ये ‘आशा किरण मॉडेल’च्या आधारे सेवा राबवली जाणार आहे. या मॉडेलमध्ये आशा सेविकांमार्फत घराघरात प्राथमिक नेत्रतपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रेफ्रॅक्शन व चष्म्यांचे वितरण तसेच शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा सर्व टप्प्यांवर नेत्रआरोग्यसेवा पुरवली जाईल.
कार्यक्रमात स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धी, समुदायामध्ये जनजागृती मोहीम, शाळा व ग्रामपंचायत पातळीवर आरोग्यविषयक संवाद, स्थानिक स्वयंसेवी संस्था व माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच कार्यक्षमता व परिणामकारकता मोजण्यासाठी डेटा संकलन व विश्लेषण अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभ होईल आणि दृष्टीदोषामुळे होणाऱ्या अडचणी दूर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
