TIN24 (THEINDIANEWS24) – सप्टेंबर 1, 2025
मुंबई, काल दि ३० : भारताच्या राष्ट्रभावनेला उर्जा देणारे, लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठांवर गाजलेले आणि क्रांतिकारी आंदोलनांना प्रेरणा देणारे ‘वंदे मातरम’ गीत यंदा १५० वर्षे पूर्ण करत आहे. या ऐतिहासिक क्षणाला अधिक तेज देण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्ध शताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
देशभक्तीचा संस्कार घडवणाऱ्या या गीताच्या गौरवासाठी राज्य सरकारने भव्य स्वरूपाचा सार्ध शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव लोकसहभागातून साकारला जात आहे.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती लाभली. राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात समूहगान, सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालये-शाळांमध्ये विशेष उपक्रम, ग्रामीण भागातही भव्य आयोजन अशा विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
“वंदे मातरम गीत हे केवळ गाणं नाही, तर भारतमातेच्या वैभवाचं, देशप्रेमाचं आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. याचा गौरव जनतेच्या उत्फुल्ल सहभागाने झाला पाहिजे,” असे भावनिक आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी केले.
बोधचिन्हासाठी घेतलेल्या राज्यस्तरीय डिझाईन स्पर्धेत ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्रा. रवी पवार यांनी तयार केलेले आकर्षक व कलात्मक बोधचिन्ह निवडण्यात आले. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयाच्या तज्ञ परीक्षकांनी ही निवड केली.
या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील कौशल्य विद्यापीठे, आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सांस्कृतिक विभाग यांच्यामार्फत हजारो युवक-युवतींना देशभक्तीच्या भावनेशी जोडले जाणार आहे.
‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षपूर्तीचा उत्सव म्हणजे इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देतानाच नव्या पिढीत राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित करण्याचा संकल्प आहे.

Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
